उरण : विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यात महाविकास आघाडीने आपला राजकीय दबदबा कायम राखत पंचायत समितीच्या सत्तेवर दणदणीत विजय मिळवला आहे. बुधवारी (११ मार्च) झालेल्या निवडणुकीत सभापती व उपसभापती पदांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून, सभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे तर उपसभापतीपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजकीय समीकरणे आणि सत्तावाटप
पंचायत समितीच्या एकूण ८ जागांपैकी ७ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे ४ तर शिवसेना (उबाठा) गटाकडे ३ सदस्य आहेत. आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सभापतीपद ‘शेकाप’ला, तर उपसभापतीपद शिवसेना (उबाठा) गटाला देण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसाच आज दुपारी २ वाजता उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी विनोद मिंडे आणि गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील उपस्थित होते.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि जल्लोष
निवड जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, राष्ट्रवादीच्या नेत्या भावनाताई घाणेकर, शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रवी घरत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले.
उरणमध्ये महाविकास आघाडीची लाट कायम
गेल्या चार वर्षांनंतर झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उरणमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या ८ पैकी ७ जागा जिंकण्यासोबतच, रायगड जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ३ जागांवरही आघाडीने वर्चस्व राखले आहे. यापूर्वी नगर परिषदेतही भाजपचा पराभव करून सत्ता काबीज केल्याने तालुक्यातील राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
दृष्टीक्षेपात: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल
जिल्हा परिषद विजयी उमेदवार (एकूण ४ जागा):
नवघर गट: प्रेरणा पाटील (शिवसेना उबाठा)
जासई गट: डॉ. मनीष पाटील (काँग्रेस)
चिरनेर गट: ॲड. अविनाश ठाकूर (काँग्रेस)
चाणजे गट: रीना जितेंद्र घरत (भाजप)
पंचायत समिती विजयी उमेदवार (एकूण ८ जागा):
नवघर गण: परेश ठाकूर (शिवसेना उबाठा)
भेंडखळ गण: दीपक सुरेश भोईर (शिवसेना उबाठा)
जासई गण: निर्मला नरेश घरत (शेकाप)
चिर्ले गण: प्रियंका दीपक मढवी (शेकाप)
केगाव गण: महेश म्हात्रे (शेकाप)
आवरे गण: प्रारंभी गावंड (शेकाप)
चिरनेर गण: कविता रुपेश पाटील (शिवसेना उबाठा)
चाणजे गण: कैलास भोईर (भाजप)

