• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये सत्तेचा महासंग्राम: आज सभापती निवड, तर उद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा फैसला

ByEditor

Mar 11, 2026

अलिबाग: विशेष प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेच्या रणधुमाळीचा आज मुख्य दिवस असून राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. आज, बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे. या निवडीनंतर लगेचच उद्या, गुरुवार १२ मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अलिबागकडे लागले आहे.

आज पंचायत समित्यांमध्ये चुरस; कोणाच्या गळ्यात पडणार सभापतीपदाची माळ?

आज सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सभापती निवडीसाठी सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. बहुमताचे गणित जुळवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रात्रीपासूनच बैठकांचे सत्र राबवले आहे. काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने पक्षांतर्गत पेच निर्माण झाला असला तरी, आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडीनंतर पंचायत समित्यांच्या आगामी पाच वर्षांच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे.

उद्याच्या जिल्हा परिषद निवडीसाठी दिग्गजांचा रायगडमध्ये मुक्काम

उद्या, १२ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी राज्याच्या राजकारणातील बडे नेते रायगडमध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. या प्रक्रियेसाठी रवींद्र चव्हाण (भाजप प्रदेशाध्यक्ष), सुनील तटकरे (खासदार व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष), अदिती तटकरे (महिला व बालविकास मंत्री), आशिष शेलार, प्रवीण दरेकर (भाजप नेते), आमदार रविशेठ पाटील, धैर्यशील पाटील, सुधाकर घारे, अनिकेत तटकरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अलिबाग चौपाटीवर विजयाचा जल्लोष आणि शक्तीप्रदर्शन

जिल्हा परिषद निवडीनंतर भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने अलिबाग समुद्रकिनारी एका भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सुमारे पाच हजार कार्यकर्ते बसू शकतील असा अवाढव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडीनंतर मोठ्या जल्लोषात शक्तीप्रदर्शन करून महायुती आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

आज होणाऱ्या सभापती निवडी आणि उद्याचा जिल्हा परिषदेचा निकाल यावर जिल्ह्याच्या सत्तेची आगामी समीकरणे अवलंबून आहेत. सलग दोन दिवसांच्या या राजकीय घडामोडींमुळे रायगडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!