• Tue. Mar 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडीतून सुटकेची अपेक्षा

ByEditor

Mar 10, 2026

कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ, पण सुविधांचा अभाव; प्रवासी संघटनेची खासदारांकडे धाव

माणगाव । सलीम शेख
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक आणि पर्यटकांची ये-जा असते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे आणि सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘दिवा ते वीर’ मेमू रेल्वे सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुरेश जैन यांनी केली आहे.

माणगाव शहर हे म्हसळा, श्रीवर्धन आणि तळा या तालुक्यांचे मुख्य केंद्र असल्याने येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा ओघ असतो. सध्या माणगाव स्थानकात थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळत असून, रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून काही गाड्यांना थांबे मिळाले असले, तरी जनशताब्दी, मंगला, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या आणि ऋषिकेश यांसारख्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या अद्यापही येथे थांबत नाहीत. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे महामार्गावर अधिक ताण निर्माण होत आहे.

प्रवासी संघटनेच्या मते, रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून वीर स्थानकात तांत्रिक सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवा ते रोहा या धर्तीवर दिवसातून ३ ते ४ वेळा ‘दिवा-वीर’ मेमू चालवणे सहज शक्य आहे. दुपारच्या सत्रात रेल्वे उपलब्ध नसल्याने एसटी आणि खासगी बसवर अवलंबून राहावे लागणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.

या प्रलंबित मागण्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. “माणगाव स्थानकात जास्तीत जास्त गाड्यांना थांबे मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून, लवकरच याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून शुभसंकेत मिळतील,” अशी आशा खासदार तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!