• Tue. Mar 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनच्या जावेळे परिसरात बिबट्याची दहशत; गुरांवर हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल

ByEditor

Mar 10, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित
गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जावेळे परिसरातील विविध ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा (ठसे) वारंवार आढळून येत आहेत. या हिंस्र प्राण्याच्या वावरामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. येथील शेतकरी विजय रांगले यांची गुरे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी जंगलात गेली असता, त्यापैकी दोन गुरांचा बिबट्याने शिकार करून फडशा पाडला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही इतर शेतकऱ्यांची पाच ते सहा जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि पशुपालक आता आपल्या जीवाबद्दल आणि जनावरांच्या सुरक्षिततेबद्दल कमालीचे चिंतेत आहेत.

बिबट्या सातत्याने लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन वन विभागाने परिसरात तातडीने गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात त्वरित पिंजरा लावावा, जेणेकरून भविष्यातील अनर्थ टाळता येईल, अशी विनंती जावेळेतील ग्रामस्थांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!