• Tue. Mar 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रामाणिकपणाचा आदर्श! उरणच्या नवनाथ ठाकूर यांनी परत केले १७ तोळ्यांचे सोने

ByEditor

Mar 10, 2026

उरण । घन:श्याम कडू
आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी युगात दुसऱ्याची मौल्यवान वस्तू सापडली की ती स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मात्र, उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नारायण ठाकूर यांनी १७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कृतीमुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ ठाकूर यांना ट्रान्स इंडिया कंपनीसमोर रस्त्यात तब्बल १७ तोळ्यांचा सोन्याचा गंठण आणि काही रोख रक्कम सापडली होती. आजच्या सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता, इतकी मोठी मालमत्ता सापडूनही ठाकूर यांचा डळमळीत झाला नाही. त्यांनी या मौल्यवान वस्तूवर कोणताही डोळा न ठेवता किंवा कोणत्याही बक्षीसाची अपेक्षा न करता, तातडीने शोध घेऊन ही वस्तू कोप्रोली येथील श्री. राजू शांताराम पाटील (राजू टेलर) यांच्या पत्नीला सन्मानाने परत केली.

आजच्या काळात जिथे पावलोपावली फसवणुकीचे प्रकार घडतात, तिथे इतक्या मोठ्या किमतीचे दागिने प्रामाणिकपणे परत करणे हे खरोखरच मोठे धाडस आणि सचोटीचे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. समाजात अजूनही सच्चेपणा आणि माणुसकी जिवंत आहे, हे नवनाथ ठाकूर यांच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या या अभिमानास्पद कार्याबद्दल उरण परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी असेच सामाजिक कार्य सुरू ठेवावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!