कोलाड । विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे कोलाड गावाच्या हद्दीत आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका अज्ञात इसमाने धावत्या मस्त्यगंधा एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी, दिनांक ९ जून २०२६ रोजी सकाळी ७:३७ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहा ते पनवेल रेल्वे मार्गावरील कोलाड गावाच्या हद्दीत अप रेल्वे लाईनवर किलोमीटर क्रमांक १०/२५ ते १०/२१ च्या दरम्यान, मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मस्त्यगंधा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२६२०) समोर या इसमाने अचानक उडी घेतली. रेल्वेची जोरदार धडक बसल्यामुळे या इसमाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळाला भेट दिली. मयत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षांच्या दरम्यान आहे. त्याचा रंग सावळा असून, अंगात लहान चौकटीचा (चेक्सचा) शर्ट आणि फिक्कट रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या वर्णनाचा व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा कोणाचा नातेवाईक बेपत्ता असल्यास नागरिकांनी तातडीने कोलाड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडिक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
