• Tue. Jun 9th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कायदा फक्त गरिबांसाठीच? श्रीवर्धनमध्ये रिसॉर्ट चालकाकडून थेट सार्वजनिक गटारच गायब!

ByEditor

Jun 9, 2026

श्रीवर्धन। अनिकेत मोहित
पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना श्रीवर्धन नगरपालिकेकडून शहरात नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने घरबांधणी, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकाम धारकांना रस्ते व सार्वजनिक गटारांमधील बांधकाम साहित्य तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्तीची कारवाई करण्याची ‘दवंडी’ही पालिकेने पिटली आहे. मात्र, शहरातील एका धनदांडग्या व्यावसायिकाला पालिकेचे हे नियम लागू होत नाहीत का? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

गटाराचा नैसर्गिक प्रवाह रोखला

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धनमधील एका वजनदार व्यावसायिकाच्या हॉटेल आणि रिसॉर्टचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. या बांधकामासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी चक्क सार्वजनिक गटारात दगड, माती आणि इतर राडारोडा टाकून रस्ता रुंद करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असतानाही हे अडथळे अद्याप जैसे थे आहेत. या भागात पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह असतो. त्यामुळे गटार अडवल्याने मुसळधार पावसात पाण्याचा निचरा न होता, सर्व पाणी रस्त्यावर व नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

पालिकेच्या ‘दुहेरी’ भूमिकेवर आक्षेप

एकीकडे सामान्य नागरिकाने रस्त्यावर थोडे जरी बांधकाम साहित्य टाकले, तर पालिका प्रशासन तात्काळ नोटिसा बजावून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारते. मात्र, दुसरीकडे प्रभावशाली व्यक्तींकडून थेट सार्वजनिक गटारच बुजवले जात असताना पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का? असा सवाल स्थानिक विचारत आहेत. या दुहेरी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

“नियम आणि कायदा सर्वांसाठी समान असतो, मग त्याची अंमलबजावणी करताना धनदांडग्यांना वेगळी सवलत का? पालिका प्रशासन केवळ गरिबांवरच आपला रुबाब दाखवणार का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आता पावसाळा अगदी उंबरठ्यावर असताना, सार्वजनिक आरोग्याशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्या या प्रकाराची श्रीवर्धन नगरपालिका दखल घेणार का? संबंधित हॉटेल व्यावसायिकावर ठोस कारवाई करून ते गटार मोकळे केले जाणार की हा प्रकार नेहमीप्रमाणे दाबला जाणार? याकडे संपूर्ण श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!