• Mon. Jun 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड एमआयडीसीत मोठी दुर्घटना: रिलायबल केमिकल कंपनीत छताचा पत्रा तुटल्याने खाली कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू

ByEditor

Jun 8, 2026

महाड | मिलिंद माने
महाड औद्योगिक क्षेत्रातील ‘रिलायबल केमिकल’ कंपनीत रविवारी (७ जून) सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पावसाळ्यापूर्वी छताच्या दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी वर चढलेल्या एका उत्तर भारतीय कामगाराचा पत्रा तुटून खाली कोसळल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. छतावर चढताना कंपनीकडून कोणतीही सुरक्षेची साधने पुरवली गेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसीमधील ‘रिलायबल केमिकल इंडस्ट्रीज’ या कारखान्यात पावसाळ्यापूर्वी छताची देखभाल व दुरुस्तीचे काम काढण्यात आले होते. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जितेंद्र तेजबहादुर गौतम (वय २८, रा. बेला, उत्तर प्रदेश) आणि श्रवण कुमार राजाराम यादव (वय ४१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे छताची पाहणी करण्यासाठी वर चढले होते. यादरम्यान अचानक छताचा एक पत्रा तुटल्याने श्रवण कुमार थेट खाली कोसळले. उंचीवरून अत्यंत वेगाने खाली सिमेंटच्या जमिनीवर आदळल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर मृत कामगार हा कंपनीचा थेट कर्मचारी नव्हता. मात्र, असे असले तरी कंपनीच्या वतीने या कामगाराच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे कंपनीचे मालक लायनल परेरा यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, कारखान्याच्या छतासारख्या धोकादायक ठिकाणी कामगारांना चढवण्यापूर्वी कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षेचा बेल्ट, हेल्मेट किंवा नेट यांसारखी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येत असून, सुरक्षेच्या त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलीस तपास सुरू: या अपघाताची महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार पी. एस. पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!