रायगड | अमुलकुमार जैन
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी (८ जून) दुपारी कशेडी घाटातील भोगाव हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा थरारक अपघात झाला. भरधाव कार थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस घुसल्याने कारचालक तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची वृद्ध आई गंभीर जखमी झाली आहे.
नियंत्रण सुटल्याने कारचा चेंदामेंदा
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी कार (क्र. MH-05-CA-3367) कशेडी घाटातील भोगाव परिसरात आली असता, चालक निकेश बालन (रा. कल्याण) यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट समोरील डंपरच्या मागील भागात जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू, आईवर अतिदक्षता विभागात उपचार
या दुर्घटनेत कारचालक निकेश बालन आणि त्यांच्या आई लीसी बालन हे दोघेही कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस मदत केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच निकेश बालन यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या लीसी बालन यांना पुढील उपचारांसाठी कळंबोली येथील एमजीएम (MGM) हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार यांच्यासह ‘काळभैरव रेस्क्यू टीम’चे अरुण मोहिते आणि लक्ष्मण कळंबे यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य केले.
वाहतूक काही काळ विस्कळीत
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस हवालदार रंजेश पवार पुढील तपास करत आहेत.
