उरण | घनःश्याम कडू
बोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर १ जूनच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उरण तालुका हादरला आहे. या दुर्घटनेत दोन होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अपघाताला अनेक दिवस उलटूनही नेमके काय घडले, याचे स्पष्ट उत्तर अद्याप समोर आलेले नाही. परिणामी, जनतेमध्ये संशय आणि संतापाचे वातावरण असून, हा अपघात होता की घातपात, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. या दुर्दैवी अपघातात कै. निखिल कुकडे आणि कै. महेश चांदेकर या दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले असून दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरुवातीला हा दोन दुचाकींचा अपघात असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती, वाहनांची झालेली दुरवस्था आणि परिसरात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे या प्रकरणाभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.
सत्य परिस्थिती समोर न आल्याने तालुक्यात सध्या अफवांचे पीक आले आहे. काहींच्या मते दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली, तर काहींचा दावा आहे की एखाद्या भरधाव अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला आहे. काही स्तरांतून तर थेट घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे. अधिकृत माहितीअभावी नागरिकांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत अखेर उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात अपघाताची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, बोरी-मोरा रस्त्यावरील सर्व शासकीय व खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत आणि सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून अपघाताचे खरे कारण शोधून काढावे. आज उरणकरांच्या मनात अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. जर हा साधा अपघात असेल तर त्याचा तपास निष्कर्षासह जनतेसमोर का येत नाही? अज्ञात वाहनाचा सहभाग असेल तर ते वाहन कुठे आहे? आणि जर घातपाताच्या चर्चांमध्ये तथ्य नसेल, तर त्या अफवा थांबवण्यासाठी पोलीस अधिकृत माहिती का जाहीर करत नाहीत? हा विषय केवळ एका अपघातापुरता मर्यादित नसून दोन कुटुंबांच्या न्यायाचा आहे. या प्रकरणात सत्य जितके लवकर समोर येईल, तितका जनतेचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास दृढ होईल, अन्यथा संशयाचे धुके अधिक गडद होऊन जनतेचा असंतोष वाढण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.
