श्रीवर्धन । संदेश घोलप
श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा केल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पाटबंधारे विभागाच्या देखरेखीवर आणि एकूणच कारभारावर संशय व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानवली धरणातील गाळ काढण्याचे कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात धरण परिसरात गाळ काढण्याऐवजी जेसीबी आणि इतर अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने थेट टेकड्यांमधील माती खणून काढण्यात येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून या धरण परिसरातून मोठ्या क्षमतेच्या १० चाकी डंपरच्या फेऱ्या सातत्याने सुरू होत्या. या डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात मौल्यवान माती बाहेर नेण्यात आली असून, ही माती परिसरातील विविध व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरली गेल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.

या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल केले असून, गाळ उपशाच्या नावाखाली प्रत्यक्षात मातीचे व्यावसायिक उत्खनन का झाले, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या तोडण्याची परवानगी कोणी दिली, या उत्खननासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, हे काम सुरू असताना पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नियमित देखरेख केली होती का, याबाबतही नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
स्थानिक सूत्रांच्या मते, धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे हे पाणी साठवण व्यवस्था तसेच जलप्रवाह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक घटक आहेत. या भौगोलिक संरचनेत मोठ्या प्रमाणावर मानवी हस्तक्षेप व फेरबदल केल्यास, भविष्यात धरणाचा जलसाठा, शहराचा पाणीपुरवठा आणि स्थानिक पर्यावरणीय संतुलनावर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे तर, धरणाच्या काही विशिष्ट भागात अवाजवी आणि नियमबाह्य खोलीकरण झाल्याचाही आरोप नागरिकांनी केला असून, यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तथापि, या दाव्यांची अधिकृत प्रशासकीय पडताळणी अद्याप झालेली नाही.
या गंभीर पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण उत्खनन प्रकरणाची तातडीने एका स्वतंत्र समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, धरणातून प्रत्यक्षात किती गाळ काढला आणि किती माती वाहून नेली याचे अधिकृत मोजमाप करून ते जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत धरण क्षेत्राची संयुक्त प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी आणि चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. रानवली धरणातील या संशयास्पद गाळ उपसा प्रकरणामुळे श्रीवर्धन तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आता स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ पातळीवरून यावर काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
