• Wed. Jul 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रानवली धरणातील गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; अपूर्ण योजनांचीही चौकशी करण्याची मागणी

ByEditor

Jul 22, 2026

श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातून रानवली, गालसुरे, निगडी आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्यात धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होत असल्याने तेच पाणी नागरिकांच्या नळांपर्यंत पोहोचत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशा गढूळ पाण्याच्या वापरामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान, या परिसरात जलजीवन मिशन योजनांअंतर्गत करण्यात आलेली अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी कामे पूर्ण न झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींनी ती आपल्या ताब्यात घेतलेली नसल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे या अपूर्ण कामांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

तसेच गावातील पाण्याच्या टाक्यांखाली पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) यंत्रणा उभारण्याची तरतूद होती का, असल्यास ती का बसविण्यात आली नाही आणि याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे मागणी केली होती का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गढूळ व अशुद्ध पाण्यामुळे अतिसार, कावीळ, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अपूर्ण कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच रानवली धरणातून होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!