रायगड | सागर पेरेकर
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या राजमाची परिसरातील दुर्गम जंगलात वाट चुकलेल्या तीन ट्रेकर्सना कर्जत पोलिसांनी धाडसी शोधमोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
ठाणे येथून व्हीतराज नरेंद्रसिंग वाला, अनिरुद्ध शिवा सुब्रामनियन रामनाथ, आकाश राजेश यादव, आकाश जय सिंह आणि मीत धर्मेश ठक्कर हे पाच मित्र राजमाची परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. निसर्गरम्य पण अत्यंत अवघड अशा जंगल परिसरात भ्रमंती करत असताना, यातील तिघेजण मुख्य गटापासून वेगळे झाले. चुकीचा मार्ग निवडल्यामुळे हे तिघेही घनदाट जंगलात आणि दुर्गम डोंगराळ भागात भरकटले.
आपण जंगलात अडकल्याचे लक्षात येताच ट्रेकर्सनी आपत्कालीन हेल्पलाईनद्वारे कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलिसांनी विलंब न करता तातडीने शोधमोहीम हाती घेतली. बीट मार्शल कारकुड, पोलीस शिपाई संतोष खाडे, निर्मल यांच्यासह स्थानिक मदतगार अंकुश वरे आणि वाळकु निरगुडा यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
रात्रीची वेळ, गाढ अंधार, निसरड्या वाटा आणि घनदाट जंगल अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत पोलीस पथकाने सलग अनेक तास शोधकार्य चालवले. अखेर पोलिसांना या तिन्ही ट्रेकर्सचा शोध घेण्यात यश आले. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून त्यांना सुरक्षितपणे कर्जत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आवश्यक वैद्यकीय व प्राथमिक मदतीनंतर त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी रवाना करण्यात आले.
पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, “दुर्गम आणि अनोळखी भागात ट्रेकिंगसाठी जाताना पर्यटकांनी अनुभवी मार्गदर्शक (गाईड), आवश्यक सुरक्षितता साहित्य आणि पूर्ण पूर्वतयारी करूनच प्रवास करावा,” असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राहुल गायकवाड यांनी केले आहे.
