• Tue. Jul 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल!

सर्व ९ सदस्य एकवटले; शंभर टक्के सदस्यांचा सरपंच दत्ताशेठ खांबे यांच्या विरोधात निर्णय

माणगाव । सलीम शेख
राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या भाले ग्रुप ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच दत्ताशेठ खांबे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीतील शंभर टक्के सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाले ग्रुप ग्रामपंचायतीवर गेली १५ ते २० वर्षे एकहाती सत्ता राहिली असून या भागातील ज्येष्ठ राजकीय नेते तथा महाड–माणगाव–पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे राजकारण आकार घेत असल्याचे बोलले जाते.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. मात्र थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार उभा केल्याने चुरशीची लढत झाली. त्या वेळी अनेकांचा विरोध असतानाही बाबुशेठ खानविलकर यांनी आपले विश्वासू सहकारी दत्ताशेठ खांबे यांना उमेदवारी देत सर्व ताकद पणाला लावली. अखेर खांबे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधी उमेदवाराचे अनामत रक्कमही जप्त होईल, असे घवघवीत यश संपादन केले होते.

मात्र त्यानंतरच्या काळात ग्रामपंचायतीतील सदस्यांमध्ये असंतोष वाढत गेला. सरपंचांचा मनमानी कारभार, सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, विकासकामांबाबत समन्वयाचा अभाव, निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष, तसेच पंचायत प्रशासनात सदस्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असल्याचे सांगितले जाते.

सदस्यांनी या तक्रारी नेतृत्वाकडे मांडल्या. मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. याशिवाय, निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या व्यक्तींशी राजकीय जवळीक वाढवत विद्यमान सदस्यांना पंचायत कामकाजात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अखेर सर्व सदस्यांनी एकत्र येत सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात उपसरपंच प्रकाश सुंदर शेपुंडे, सुरेखा सुरेश कुपले, विवेक दत्तात्रय खानविलकर, अस्मिता संदेश चालके, वैशाली अशोक शेपुंडे, रंजना मारुती वाघमारे, उपेंद्र आप्पा जाधव, वर्षा विलास पेंढारी आणि संजीवनी संजय भेसळ या सर्व नऊ सदस्यांनी २० जुलै २०२६ रोजी माणगावचे तहसीलदार यांच्याकडे सरपंच दत्ताशेठ खांबे यांच्या विरोधात अधिकृतपणे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला.

या अर्जाची दखल घेत तहसीलदारांनी गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता भाले ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत अविश्वास ठरावावर निर्णय होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.

भाले ग्रुप ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच थेट निवडून आलेल्या सरपंचांविरुद्ध सर्व सदस्यांनी एकमताने अविश्वास ठराव आणल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. विशेष सभेत होणाऱ्या निर्णयाकडे आता ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!