• Tue. Jul 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड हायस्कूलचा रस्ता की खड्ड्यांचे साम्राज्य? विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरूच

ByEditor

Jul 21, 2026

कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड गावाकडून कोलाड हायस्कूलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी बिकट स्थिती या मार्गावर निर्माण झाली असून, या खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीव टांगणीला

या मार्गावर द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कोलाड प्राथमिक मराठी केंद्र शाळा आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने हे खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. रस्ता अरुंद असल्याने समोरासमोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना चालकांची मोठी कसरत होते. या धोकादायक परिस्थितीमुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जिवावर उदार होण्यासारखेच झाले आहे.

महत्त्वाचा मार्ग असूनही दुर्लक्ष

हा रस्ता केवळ हायस्कूलसाठीच नाही, तर कोलाडकडून आंबेवाडी व धाटाव एमआयडीसीकडे जाणारा एक जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. परिसरात नागरी वस्ती वाढल्याने या रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गाची दुरवस्था झाली आहे.

पालकांमध्ये संतापाची लाट

रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “कोणाचा नाहक जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!