विश्वास निकम
कोलाड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात भातशेतीच्या कापणीला खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते, परंतु यावर्षी १३ ऑक्टोबरपासुन २६ ऑक्टोबरपर्यंत विज, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भातशेती आडवी झाली, यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर दिवाळी आली यामुळे दिवाळीनंतरच भात कापणीला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली.
रायगड जिल्ह्यासह कोलाड-खांब परिसरात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. परंतु पाऊस लांबल्याने भात पिक भुईसपाट झाला आहे. थोडाफार वाचलेला भात पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरु झाली आहे. भात कापणीनंतर दोन ते तीन दिवस ऊन देणे आवश्यक आहे, नंतर भारे बांधून मळणी रचली जाते. यामुळे भाताच्या दाण्याला उब मिळते व भाताचा दाणा खरडण्यास मदत होऊन तांदूळ उत्तम प्रकारे मिळते.
परंतु आता निसर्गाचा नियम बदलत चालला असुन पावसाच्या भीतीमुळे उरला सुरलेला भात पदरात पाडण्यासाठी एकीकडे भात कापणी केली जात आहे तर दुसऱ्या बाजूला भात झोडणीचे काम केले जात आहे. यावर्षी रायगड जिल्ह्यात यावर्षी ९६ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली. यामध्ये सुवर्णा, कोलम, रत्ना व इतर भात पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. यावर्षी हवामान खात्याने अंदाजानुसार पाऊस उत्तम प्रकारे झाला व भात पिक ही चांगले आले परंतु परतीचा पाऊस लांबल्यामुळे भात पिके आडवी झाली यामुळे यंत्राच्या साह्याने भातकापणी करणे शक्य नाही यामुळे भातकापणी करतांना विलंब होतांना दिसत आहे.
भात पिक तयार होण्यासाठी ९० ते १०० दिवस लागतात, परंतु परतीचा पाऊस लांबल्यामुळे भात पिक तयार होऊन १५ ते २० दिवस जास्त झाले तरी भात कापणीला सुरुवात झाली नाही. यामुळे भात पिक भुई सपाट झाले असुन भात कापणीसाठी विलंब लागत आहे व मजूर जास्त लागत आहेत.
-लीलाधर दहिंबेकर
शेतकरी, गोवे