• Fri. Jul 11th, 2025 12:02:53 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी उपाध्यक्ष जयंवत अंबाजी यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचे ६ वर्षांकरिता निलंबन

ByEditor

Nov 26, 2024

खासदार धैर्यशील पाटील यांची प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

अमुलकुमार जैन
रायगड :
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांना पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंवत अंबाजी यांच्यासह जिल्हा चिटणीस महेंद्र चौलकर, परशुराम म्हात्रे, ओ. बी. सी. मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर राणे यांनी साथ देत पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांचे भारतीय जनता पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन केले असल्याचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

रायगड जिल्ह्यातील 192 अलिबाग मुरुड विधानसभा निवडणुकीत अलिबाग विधानसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उप जिल्हाध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिलीप भोईर यांना अर्ज दाखल केल्यापासून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच अर्ज मागे घेण्याच्या पूर्व संध्येपासून दिलीप भोईर यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तसेच मंत्री महोदय यांच्याशी संपर्क तोडला होता. शेवटपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांनी युती धर्म पाळला नाही व पक्ष विरोधी काम केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची घोषणा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी अलिबाग गोंधळपाडा नजीकच्या वृंदावन सोसायटी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधत केली होती. त्यावेळी सतीश धारप, ऍड. महेश मोहिते , मिलिंद पाटील, उदय काठे, गिरीश तुळपुळे, राजेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बंडखोर दिलीप भोईर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते यांचे आदेश डावलून पक्ष विरोधी कारवाया करीत मदत केल्याने महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या निवडणुकीमध्ये अनंत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंवत अंबाजी यांच्यासह जिल्हा चिटणीस महेंद्र चौलकर, परशुराम म्हात्रे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी साथ दिली होती. त्यामुळे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी जवळपास 33 हजार मते घेतल्याने त्याचा परिणाम महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या मताधिक्यावर झाला असल्याचे दिसून आले आहे.

दिलीप भोईर हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीमधील जागा वाटपामध्ये अलिबाग मतदार संघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना गेल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर हे नाराज होते. त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भोईर हे पूर्वी शेकापक्षात होते. दोन वर्षापूर्वी ते भाजपमध्ये आले. अलिबाग मुरुड मतदार संघातील काम पाहून भाजपने त्यांना जिल्हा उपाध्यक्ष तसेच अलिबागच्या भाजपच्या वॉर रूमची जबाबदारी दिली होती. मतदार संघात भोईर यांनी भाजपची ताकद वाढविली होती. अलिबागचा पुढील आमदार भाजपचा असेल असे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग येथे केले होते. त्यामुळे भोईर हे भाजपा उमेदवारी देईल म्हणून आशावादी होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये अलिबागची उमेदवारी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना दिल्याने ते नाराज होते.

दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गाजावाजा करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी भारतीय जनता पक्षासहित महायुतीचे विविध पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधत होते. मात्र, भोईर यांनी त्यांच्या संवादाला प्रतिसाद दिला नाही. अलिबाग- मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघात महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भारतीय जनता पार्टीचे बंडखोर दिलीप भोईर यांनी निवडणूक रिंगणात उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुक लढवली.

भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष दिलीप भोईर यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. महायुतीच्या धोरणानुसार अधिकृत उमेदवार असतानाही उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांची वरिष्ठ नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून पक्षाच्या धोरणाविरोधात कारवाई केल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यासमवेत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील याबाबतची समाज देण्यात आली होती. तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत राहून काम केल्यास पक्षाला कटू निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी स्पष्ट ताकीद खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!