समीरा अँड निधी बळवली पेण संघाने पटकावला तृतीय क्रमांक
पेण संघाचा दीपक पाटील ‘मॅन ऑफ द सिरीज’चा मानकरी
विनायक पाटील
पेण : रायगड जिल्ह्यातील मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी रायगड 40+ प्रीमियर लीगचे आयोजन यावेळी खारघर येथे करण्यात आले होते. मोठ्या दिमाखात ही लीग पार पडली. या लीगमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. दहा दिवस क्रिकेट स्पर्धा खेळण्यात आली होती.
या रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये समीरा अँड निधी बळवली पेण या संघाने तृतीय क्रमांक पटकावून आपल्या पेण तालुक्याचे वर्चस्व खारघरमध्ये पण सिद्ध केले. समीरा अँड निधी बळावली पेण या संघाला मान्यवरांच्या व आयोजकांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. टीम मालक संजय डंगर व कर्णधार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडूंनी सांघिक खेळ खेळून संघाला टॉप 4 मध्ये नेण्याची कामगिरी केली आणि खास करून या संपूर्ण लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करून नेत्रदीपक कामगिरी बजावून प्रेक्षकांची आणि सर्वांची मने जिंकून समीरा अँड निधी बळवली संघाच्या दीपक पाटील यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. त्याला फ्रिज व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
समीरा अँड निधी बळवली संघाचे टीम मालक संजय डंगर यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सर्वप्रथम आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच माझा संघ टॉप 8 मध्ये पोहोचला हेच माझ्यासाठी खूप मोठे आनंदाचे क्षण होते. आमच्या संघाने सांघिक खेळ दाखवला असला तरी आमच्या संघातील अष्टपैलू खेळाडू दीपक पाटील यांच्या फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावरच आम्ही टॉप 4 मध्ये पोहोचून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलो असल्याचे संजय डंगर यांनी सांगितले. तसेच त्यांनी पुढल्या वर्षी रायगड 40+ प्रीमियर लीगचे आयोजन पेण नगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करावे त्यासाठी माझ्या परीने मी पूर्ण मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.
समीरा अँड निधी बलवली पेण या संघाने खारघर येथे आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये तृतीय क्रमांक पटकावल्याने पेण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व क्रिकेटप्रेमींनी संघाचे कर्णधार सतीश पाटील, टीम मालक संजय डंगर तसेच सर्व खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
