विनोद भोईर
पाली : रायगड जिल्ह्यात महायुती मध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शिवसेना, भाजप व रिपाइं एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झालीय. अशातच शिवसेनेचे अतिशय मानाचे व महत्वाचे समजले जाणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिला आहे. देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे , यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी पालीत रविवार दि.(19)रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली.
दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षसंघटना वाढीचे कौशल्य, दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व, कर्तुत्व व प्रभावी नेतृत्वगुण असलेल्या प्रकाश देसाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे, तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याचवेळी देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकारी कार्यकर्ते यांचे देखील आभार मानले आहेत. तसेच राजीनामा देण्यामागे कुणावरही नाराजी नसल्याचे म्हटले आहे. मात्र याचवेळी त्यांनी एक खंत व्यक्त करताना काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नसून नेतृत्वगुण व कार्य नसलेल्या व्यक्तींना देखील पदे दिली जात आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्ष वाढीसाठी मेहनत घेणारे काम करणारे पदापासून दूर राहत आहेत, परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत असल्याचे ताशेरे देसाई यांनी ओढले. या कारणाने पक्षाचा ऱ्हास होत असल्याने त्यासाठी त्याची कारणमीमांसा करावी लागेल, आत्मचिंतन करावे लागेल, असे देसाई म्हणाले.
जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खीळ बसली असल्याचे देसाईंनी म्हटले असून याची कारणमीमांसा होणे गरजेचे असल्याचे देसाई म्हणाले.
