क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाडतर्फे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महसूल विभाग अलिबाग संघाने आरोग्य कर्मचारी संघटना रायगड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे.
अलिबाग मुरुड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) मुकेश चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेमध्ये पोयनाड व्यापारी असोसिएशन क्रिकेट संघ, रायगड जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, अलिबाग तालुका महसूल विभागाचे दोन संघ व झुंझार वॉरियर्स अशा पाच संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम लीग व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महसूल विभागाचा अष्टपैलू खेळाडू कल्पेश नाईक व भेदक गोलंदाज राकेश गोरेगावकर यांनी अप्रतिम खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निलेश कार्लेकर यांनी तुफान फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघासमोर कडवे आव्हान उभे केले होते. स्पर्धेचा मालिकावीर म्हणून कल्पेश नाईक याला वॉरियर्स कंपनीची बॅट व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ठ फलंदाज म्हणून जिल्हा आरोग्य कर्मचारी संघाचा खेळाडू निलेश कार्लेकर, उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून महसूल विभागाचे राजेश गोरेगावकर व झुंझार वॉरियर्स संघाचा सुरज चवरकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी अलिबागचे नायब तहसिलदार संदीप जाधव, पोयनाडचे मंडळ आधिकारी महेश निकम, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमोल खैरनार, तलाठी अनिल म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर जैन, भूषण चवरकर, झुंझारचे सचिव किशोर तावडे, दिपक साळवी, क्रीडाप्रमुख नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर, सुजित साळवी, पंकज चवरकर, ॲड. पंकज पंडित यांच्यासह अलिबाग महसूल विभाग, जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
