नागरी सुविधांच्या समस्येने गावकरी त्रासले
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गाव हे येथील औद्योगिक क्षेत्र दिघीपोर्टमुळे चर्चेत आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने येथे विकासात्मक धोरण राबवून गावाचा विकास करणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व अपेक्षांचा भंग होऊन गावात आता नागरी सुविधांची उपेक्षाच राहिली आहे.
दिघी, करलास, मणेरी, नानवली ही चार गावे मिळून दिघी ग्रुपग्रामपंचायतीचा कारभार चालत आहे. येथील हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, शैक्षणिक समस्या तर आरोग्याची असुविधा अशा अनेक मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याबाबत नागरिकांकडून नेहमीच तक्रारीचा पाडा ग्रामपंचायत दरबारी वाचला जात आहे.
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडतर बनला असून रस्त्याला पथदिव्यांची दुरुस्ती, सार्वजनिक शौचालयाची मोडतोड होऊन तिथे पाणी आणि विजेची गैरसोय असल्याने विशेषतः महिलांची शौचालय अभावी कुचंबना होत आहे. जिल्हा शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी पाठपुरावा, नागरिकांना आरोग्य उपकेंद्रातून नियमित पूर्ण वेळ सुविधा मिळावी अशी स्थानिकांची मागणी आहे.
विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीने सुचवलेली कामे शासनाकडून केली जातात. त्याप्रमाणे मागणी सुद्धा करण्यात येते. स्वच्छ कारभार हाताळताना दिघी ग्रामपंचायतीकडून येथील स्वच्छता, सुलभ शौचालय, पाणी, रस्ते तसेच अरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीवर पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने वर्ष – वर्षभर तात्पुरत्या कारभारामुळे विकासाला खीळ बसली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभावामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गावाला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच ग्रामपंचायतकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र, कामे होणार सांगून दुर्लक्ष केले जात आहे.
–परशुराम पायकोळी, दिघी.