• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निवडणूक निकालानंतर चौल-तुलाडदेवीत राडा; वाहनांची तोडफोड आणि हाणामारीमुळे तणाव, दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल

ByEditor

Feb 11, 2026

रेवदंडा । सचिन मयेकर
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रेवदंडा परिसरातील चौल-तुलाडदेवी भागात राजकीय वादातून मोठा राडा झाला. दोन गटांत झालेली हाणामारी, वाहनांची तोडफोड, शिवीगाळ आणि महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.

दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या वाहनावर हल्ला

नागाव चिच बंदर येथील राजलक्ष्मी गिरीश खामीतकर (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसा, ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास त्या आपल्या नातेवाईकांसह फॉर्च्युनर कारने (क्र. MH 06 CL 6318) दर्शनासाठी जात होत्या. तुलाडदेवी मंदिराजवळील शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडवले.

आरोपींनी वाहनावर हाताने फटके मारले आणि लोखंडी रॉडने कारची मागील काच फोडून नुकसान केले. तसेच, वाहनातील एका महिलेशी अपमानास्पद वर्तन करून अश्लील शिवीगाळ केल्याचा आणि उपस्थित व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संस्कार म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, साहील राऊत, मारुती भगत यांच्यासह सुमारे १७ ते १८ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण

दुसरीकडे, सुरेंद्र मोरेश्वर म्हात्रे (वय ५८, रा. चौल-तुलाडदेवी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निवडणुकीतील पराभवानंतर ते कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयात चर्चा करत असताना विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीदरम्यान कार्यालयासमोर फटाके लावण्यावरून वाद सुरू झाला. यानंतर एका जमावाने बेकायदेशीररीत्या कार्यालयात घुसून लाकडी दांडक्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. यात काही जण जखमी झाले असून, एका महिलेला ओढून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अंकित गुरव, अमोल घरत, सिध्देश शेणवईकर, निखील राऊत, महेंद्र घरत यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर परिसरात तणाव असला तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!