सिडको भरारी पथक आणि उरण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई
उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील सिडको अधिसूचित क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर डेब्रिज माफियांविरोधात सिडकोचे भरारी पथक व उरण पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५ डंपर जप्त करण्यात आले असून ६ जणांविरोधात उरण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहाटे ३ वाजता गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावरील दिघोडा–जांभुळपाडा (डीएनए मरीन सर्व्हिसेसजवळ) मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे डेब्रिज टाकताना दोन डंपर रंगेहात पकडण्यात आले. सिडको द्रोणागिरी नोडल कार्यालयाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता उमेश प्रकाश देशमुख (वय ३६) यांच्या तक्रारीवरून अज्ञात डंपर चालक व मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुऱ्हाडे करत आहेत.
दुसरी कारवाई सकाळी ११.३० वाजता करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने जांभुळपाडा येथील ज्ञानेश्वर यार्ड परिसरात छापा टाकला. सिडकोच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्या मुकेश कुमार तिवारी (वय ३७, रा. गोपाळगंज, बिहार), गिरीजा शंकर यादव (वय ५१, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश), शिवलाल दाशो तुरी (वय २८, रा. बोकारो, झारखंड) या तिघा चालकांना ताब्यात घेण्यात आले:
याप्रकरणी सिडकोचे साहाय्यक कार्यकारी अभियंता दर्शन दिनानाथ कोळी (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तिन्ही डंपर जासई पोलीस चौकीत जमा करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. सिडको आणि पोलिसांनी अचानक राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे परिसरातील अनधिकृत डेब्रिज वाहतूकदार आणि भू-माफियांचे धाबे दणाणले आहेत.
