घनःश्याम कडू (उरण)
जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरातून प्रतिबंधित मालाची तस्करी करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला आहे. परदेशातून आलेल्या एका जहाजातील कंटेनरमध्ये बाटल्या आणि वॉलपेपर असल्याचे कागदोपत्री दाखवून, त्याआड तब्बल १० हजार किलो फटाक्यांची अवैध वाहतूक केली जात होती. ‘डीआरआय’च्या पथकाने धाड टाकून ३ कोटी रुपये किमतीचा हा माल जप्त केला असून, या कारवाईमुळे बंदर परिसरातील सुरक्षा व तपासणी यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अचूक बातमीच्या आधारे ‘डीआरआय’ने संशयित कंटेनरची सखोल झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी कंटेनरच्या सुरुवातीच्या केवळ तीन रांगांमध्ये बाटल्या आणि वॉलपेपर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यामागे संपूर्ण कंटेनरभर फटाक्यांची बेकायदेशीर साठवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत ‘२८८ गॅटलिंग’ प्रकारातील तब्बल १९ हजार ८०० फटाके जप्त करण्यात आले असून, त्यांचे एकूण वजन १० हजार किलो आहे. सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.
भारतात फटाक्यांची आयात ‘प्रतिबंधित’ श्रेणीत येते. वैध आयातीसाठी परराष्ट्र व्यापार महासंचालक (DGFT) यांची विशेष परवानगी आणि स्फोटक नियम, २००८ अंतर्गत ‘पेसो’ (PESO) संस्थेचा परवाना अनिवार्य असतो. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, घोषित मालाच्या आडून इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटक सदृश माल आणल्याने प्रशासनाने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली आहे.
या प्रतिबंधित साठ्याला कस्टम्स क्लिअरन्स मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि या तस्करांच्या सिंडिकेटची मुख्य आखणी करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन ‘डीआरआय’ने त्याला सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक केली आहे.
व्यावसायिक मालवाहतुकीच्या मार्गाचा गैरवापर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात ‘डीआरआय’ला यश आले असले, तरी हा माल नेमका कुठे पोहोचवला जाणार होता आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
