• Sat. Sep 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोर्बा विभागातील बोर्ले येथे गुरांची चोरी; जंगलात अवशेष आढळल्याने शेतकरी हादरले

ByEditor

Sep 26, 2026

अज्ञात टोळीकडून तस्करीचा संशय; माणगाव पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान

माणगाव । सलीम शेख
तालुक्यातील मोर्बा विभागातील बोर्ले परिसरात जनावरे चोरीला जाण्याच्या सलग घटनांमुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. त्यातच स्थानिक जंगल भागात जनावरांची कातडी व मृत वासराचे अवशेष आढळून आल्याने या प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. परिसरात जनावरांची चोरी करून त्यांची कत्तल किंवा तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे का, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी तीव्र भीती व संताप व्यक्त केला आहे.

पोळा सणाच्या दिवशीच शर्यतीचे दोन बैल गायब

१० सप्टेंबर रोजी ऐन पोळा सणाच्या दिवशी बोर्ले येथील एका शेतकऱ्याचे शर्यतीचे दोन बैल शेतातून घरी परतलेच नाहीत. नातेवाईक व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने अखेर माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला या घटनेची नोंद ‘हरवले’ म्हणून करण्यात आली होती. मात्र, या घटनेपाठोपाठ परिसरातून पुन्हा दोन गाई आणि दोन खोंडे चोरीला गेल्याची नवी घटना समोर आली. विशेष म्हणजे, यातील एक गाय गाभण असल्याचे पीडित शेतकऱ्याने सांगितले.

जंगलात अवशेष आढळल्याने खळबळ

शोधमोहीम सुरू असतानाच बोर्ले लगतच्या नाईटणे गावाजवळील जंगलात जनावरांची कातडी आणि मृत वासराचे अवशेष आढळून आले. हे अवशेष चोरीला गेलेल्या जनावरांचेच आहेत का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, या घटनेमुळे पशुधनाची कत्तल किंवा तस्करी होत असल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

गुन्हा दाखल; पोलिसांकडून सखोल तपास सुरू

सलग होणाऱ्या चोऱ्या आणि जंगलात सापडलेले संशयास्पद अवशेष यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी चोरी व संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास चालवला जात आहे.

बळीराजाला आर्थिक व मानसिक धक्का

ग्रामीण भागात शेतीचा कणा आणि रोजच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेले पशुधनच सुरक्षित नसेल, तर जगायचे कसे, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. दूध देणारी गाय, शेतीसाठी लागणारे बैल किंवा खोंडे रातोरात चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, शिवाय संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा केवळ ‘चोरी’ म्हणून विचार न करता तस्करीचे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!