उरण । घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा येथील उड्डाणपुलावर सध्या मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका थेट वाहनचालकांच्या जीवाला बसत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची इतक्या अल्पावधीत दुरवस्था झाली असेल, तर या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उड्डाणपुलावरील खड्डे आता वाहनचालकांसाठी जीवघेणे सापळे बनले आहेत. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने या खड्ड्यांमध्ये आदळून अनेक छोटेमोठे अपघात झाले आहेत. सुदैवाने अद्याप मोठी जीवितहानी झालेली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्याचा आर्थिक भुर्दंड वाहनमालकांना स्वतःच्या खिशातून सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात तर या खड्ड्यांचा धोका अधिकच वाढला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने जोरदारपणे खड्ड्यांत आदळून टायर, सस्पेन्शन आणि इतर महत्त्वाचे पार्ट खराब होत आहेत. रस्ता प्रशासनाचा, खड्डे प्रशासनाचे आणि नुकसानभरपाई मात्र वाहनमालकानेच का भरायची? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे. अवघ्या दोन-तीन वर्षांतच उड्डाणपुलाची अशी अवस्था होत असेल, तर बांधकामाच्या दर्जाची तपासणी झाली होती का? संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली का? पुलाच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या रस्त्यांची अशी दुर्दशा होत असताना प्रशासन मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे. खड्डे दिसत नाहीत की त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? जीव गेल्यावर पंचनामा करण्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी आजच खड्डे बुजवा! असा संतप्त इशारा वाहनचालकांकडून देण्यात येत आहे.
प्रशासनाने तातडीने जासई-दास्तान फाटा उड्डाणपुलाची पाहणी करून सर्व खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी आणि निकृष्ट कामास जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात या खड्ड्यांमुळे गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाचीच असेल, असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
