प्रशासनाचे दुर्लक्ष कायम; ‘आज रस्ता खचला, उद्या जीव जाऊ शकतो’, वाहनचालकांचा संतप्त सवाल
अलिबाग । सागर पेरेकर
रायगड जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या अलिबाग–मुरुड–रोहा राज्य महामार्गावरील अलिबाग–कुरूळ मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा मार्ग सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अलिबाग बाह्यवळण (बायपास) रस्त्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याची कड मोठ्या प्रमाणावर खचली असून तेथे रस्त्यालगत खोल दरीसदृश भाग तयार झाला आहे. त्यामुळे एखादे वाहन रस्त्याच्या कडेला गेल्यास मोठा अपघात होऊन गंभीर जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या मार्गावरून दररोज दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांसह मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या या धोकादायक भागाजवळ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. खचलेल्या भागाजवळ संरक्षक कठडे, बॅरिकेड्स अथवा पुरेसे धोक्याचे इशारा फलक न लावल्याने वाहनचालकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पावसाळ्यात कडेची माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढल्याने हा खचलेला भाग आणखी रुंदावत चालला आहे. रात्रीच्या अंधारात किंवा मुसळधार पावसात हा खचलेला भाग वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने दुचाकी घसरून खोल भागात कोसळण्याची अथवा समोरून येणाऱ्या वाहनाला धडकण्याची भीती आहे.
‘आज केवळ रस्ता खचला आहे, दुर्लक्ष केल्यास उद्या येथे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो,’ अशी संतप्त भावना स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. अलिबाग शहर आणि परिसरातून मुरुड, रोहा तसेच इतर भागात जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने प्रशासनाने केवळ मलमपट्टी न करता या ठिकाणाची तातडीने पाहणी करून रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत तातडीने बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावावेत, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.
