अलिबाग पोलिस व सां.बा. विभागाच्या प्रयत्नाने काही तासात वाहतूक सुरळीत
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग-रेवस राज्यमार्गावरील भाल गावाजवळ भला मोठा वटवृक्ष रविवार, दि. ६ एप्रिल रोजी भर उन्हाळ्याच्या दिवसात भरदुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मार्गावर कोसळल्याने वाहतूक व्यवस्था काहीकाळ ठप्प झाली होती.
या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकीवर हे झाड कोसळले. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने दोघेही थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबतची माहिती अलिबाग पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत वाहतूक कनकेश्वर फाटामार्गे वळविल्याने दोन ते तीन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. रविवार असल्याने पर्यटक या मार्गाने अलिबागमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांच्यासह स्थानिक वाहनचालक व नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

थळ वायशेत येथे रविवारी आठवडा बाजार असल्याने पंचक्रोशीतील नागरिक या आठवडा बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी रिक्षाने, तर काहीजण मालकीच्या चारचाकी व दुचाकीने आले होते. त्यांनाही काहीकाळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. दरम्यान, अलिबाग पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच थळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने काही तासात पडलेले झाड बाजूला करण्यात यश आले. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाल्याने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

या मार्गावर यापूर्वीही अनेक वेळा वृक्ष पडून मार्ग ठप्प झाला आहे. असे धोकादायक वृक्ष काढून टाकण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांतर्फे करण्यात आली असल्याचे सांगितले जाते, जेणेकरून पुढील जीवितहानी व वित्तहानी होणार नाही. सुदैवाने अजून तरी जीवितहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने आता ऐन उन्हाळ्यात असे धोकादायक झाडे कोसळत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा धोकादायक झाडांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहनचालक व प्रवासी बोलताना दिसत होते.
