महाड तालुक्यात आठ गावे व शंभर वाड्यांना पाणीटंचाईची झळ
मिलिंद माने
महाड : तालुक्यामध्ये शासनाकडून गेली अनेक वर्षांमध्ये पाणीटंचाईवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील पाणीटंचाईची झळ कायम आहे. दर पाच वर्षांनी शासनाकडून शेकडो योजनांचा पाऊस पाडून देखील महाड तालुक्यात विहिरी कोरड्याच राहत आहेत. ठोस उपाययोजना न करता केलेल्या कामांचा फायदा नागरिकांना न होता ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी गब्बर होत आहेत. एप्रिल महिना संपत असतानाच तालुक्यात आठ गावांना आणि शंभर वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी झाली आहे.

महाड तालुका हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला तालुका आहे. या तालुक्यात असणारी गावे ही दुर्गम डोंगराळ भागात आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता अशा दुहेरी संकटाला या तालुक्यातल्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात दरवर्षी जवळपास तीन हजार मिलिमीटर पाऊस कोसळतो. भौगोलिक परिस्थितीमुळे पडणारे अब्जो लिटर पावसाचे पाणी नदी नाल्याद्वारे समुद्राला जाऊन मिळत आहे. या वाहून जाणाऱ्या पाण्यावर गेली अनेक वर्षांमध्ये योग्य नियोजन न झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. महाड तालुक्यात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
एप्रिल महिन्याच्या अंतिम तारखेपर्यंत २६ ग्रामपंचायतीमधील ८ गावे, १०० वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. यामुळे टँकर मुक्तीच्या कितीही वल्गना केल्या तरी तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावाच लागत आहे. टँकर मुक्तीची घोषणा दाखवण्यासाठी ज्या गावांमध्ये योजना राबवल्या आहेत त्या गावांमध्ये टँकर मुक्ती झाल्याचे भासवले जात आहे. मात्र योजना असफल झाल्या असल्या तरी त्या ठिकाणी टँकर पुरवठा केला जात नाही. प्रत्यक्षात मात्र या गावांमधून पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवत आहेत.

महाड तालुक्यामध्ये १) पिंपळकोंड, २) दाभोळ : खलाटी, खडपवाडी, ३) वाकी बुद्रुक :आंब्याचा माळ, धनगरवाडी ,आदिवासी, वाडी ,नारायणवाडी, नाणे माचिआवाड, नांदूरवाडी, पेढामकरवाडी, रोहिदास वाडी /बौद्ध वाडी, नाणेमाची ,शेवते, ४) पाचाड, पाचाड गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड, बौद्धवाडी, मोहल्ला, पाचाड नाका, बाउलवाडी, ५) निगडे : उतेकर वाडी, रहाटवाडी, मधली वाडी, फणसेवाडी, मोरेवाडी, डोहवाडी, सावंतवाडी, खोतवाडी ,जगतापवाडी, बौद्धवाडी, ६) निजामपूर : हिरकणी वाडी, ७) कुर्ले बौद्धवाडी, ८) मुमुर्शी : आंबेवाडी, ९) मोहोत, कातिवडे, बोरगाव, वडघर भिवघर /आदिवासी वाडी, पाटील वाडी बौद्धवाडी मोहोत कोंड /आकटवाडी, सुतारवाडी / भिसे वाडी, १०) टोळ बुद्रुक : टोळ बुद्रुक गावठाण, सापे तर्फे गोवेले, टोळ बुद्रुक आदिवासी वाडी, टोळ बुद्रुक बौद्धवाडी, ११) रावतळी : मानेधार, १२) करंजाडी – मस्के कोंड, १३) कावळे तर्फे विन्हेरे : धनगर वाडी, १४) ताम्हाणे : बौद्धवाडी, पवारवाडी, दळवीवाडी, मोरेवाडी, जोगळेवाडी, धुमाळवाडी, दाभेकर वाडी, कालकाई वाडी, बद्रिकेवाडी, धनगरवाडी, मोहितेवाडी , खामकरवाडी १५) चोचींदे : चोचिंदे गवळवाडी, १६) आडी : आडी बौद्धवाडी , दत्तवाडी, डोंगरोली, १७) वारंगी : गाढव खडकवाडी, मलई वाडी, १८) कुंभे शिवथर : सुनेभाऊ १९) गोडाळे : शेडगे कोंड, झांजे कोंड, आदिवासी वाडी, २०) रेवतळे : फौजदार कोंड, २१) कुसगाव : कुसगाव खुर्द ,वाणी कोंड धारेचा कोंड मोहल्ला, बौद्धवाडी, सडेवाडी, खरबाचा कोंड, गार पाटले, धनगर वाडी, २२) दासगाव : भोईवाडी, मोहल्ला, पाटील आळी, परीट आळी, गणेश नगर, आदिवासी वाडी, बौद्धवाडी, बामणे कोंड, न्हावी कोंड, वांद्रे कोंड, चर्मकार वाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, २३) नातोंडी : जंगमवाडी, धारेची वाडी, चव्हाणवाडी २४) तळीये : पुनर्वसन, वरचे वाडी, मधली वाडी, चर्मकार वाडी, बौद्धवाडी, सुतार कोंड, कुंभे नळी, खालची वाडी, शिंदेवाडी, २५) वीर : वीर गावठाण, खरपवाडी, गणेश वाडी, परडूना वाडी, बौद्धवाडी, वीर मोहल्ला, वीर दत्तवाडी, वीर टेंभेवाडी, वीर घोळेवाडी, वीर भवानी वाडी २६) भावे : चौधरी वाडी, भावे पठार, पिंपळदरी या महाड तालुक्यातील २६ ग्रामपंचायतमधील आठ गावे व शंभर वाड्यांना एप्रिलच्या मध्यांतरित पाणीटंचाई तीव्रपणे जाणवू लागली आहे