अनंत नारंगीकर
उरण : उरण द्रोणागिरी नोड येथील सीडब्ल्युसी (बजेट) या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि, १३) रात्री १०.३०च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सदरची आग ही गोदाम व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे लागल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अग्निशमक दलाच्या जवानांच्या चित्तथरारक कसरतीमुळे आग तात्काळ आटोक्यात आली. सदर आगीत कामगार थोडक्यात बचावल्याची माहिती कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणारे गोदामं आहेत. परंतु उरण तहसील, उरण पंचायत समिती, स्थानिक ग्रामपंचायत, सीमा शुल्क विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, सिडको तसेच जिल्हाधिकारी यांच्या आर्थिक हितसंबंध, दुर्लक्षितपणामुळे मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामात फायर ब्रिगेडची सुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध नसल्याचे वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेतून पुढे येत आहे. त्यात उरण द्रोणागिरी नोड येथील सीडब्ल्युसी (बजेट) या पागोटे ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि. १३) रात्री १०.३० च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. सदरची आग ही गोदामात सुरु असणाऱ्या वेल्डिंगच्या कामातून लागली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या आगीची माहिती सिडको, जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग तात्काळ विझविली. मात्र गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या सतर्कतेमुळे कामगारांचे जीव थोडक्यात बचावले आहे. मात्र, हजार ड्रॅग सोबतच ज्वलनशील केमिकल असणाऱ्या ठिकाणांवर आग पसरली असती तर पागोटे गावातील रहिवाशांना त्यांच्या झळा बसल्या असत्या अशी भिती पागोटे गावातील रहिवाशी व्यक्त करत आहेत. तरी उरण तहसील, पोलीस यंत्रणा तसेच संबंधित खात्याचे अधिकारी वर्गाने उरणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत.
