अनंत नारंगीकर
उरण, दि. ९ : उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक खेड्यापाड्यांतील आणि आदिवासी वाड्यांतील रुग्णांसाठी आश्रयदाते ठरत आहे. मात्र रुग्णालयात पुरुष डॉक्टरांचा अभाव, परिचारिका आणि सुरक्षारक्षकांच्या रिक्त पदांमुळे येथे वैद्यकीय सुविधा कोलमडल्या आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे तातडीच्या रुग्णांसाठी यंत्रणा अपुरी ठरत आहे.
रात्रपाळी अडचणीत
सर्पदंश, प्राणी चावणे आणि इतर आकस्मिक परिस्थितींमध्ये रुग्णांना कोप्रोलीत उपचार न मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या शहरांतील रुग्णालयांत दाखल करावे लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा जीव गमावण्याचे दुर्दैवी प्रकारही घडले आहेत.
तालुक्यातील ३० खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण उरणचा भार असून तेथे रोज सुमारे २५० बाह्य रुग्णांची वर्दळ असते. त्यामुळे कोप्रोलीचे आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक आहे, मात्र वैद्यकीय मनुष्यबळाच्या अभावामुळे हे केंद्र ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांनी उरणचे आमदार महेश बालदी यांना पुढाकार घेऊन दोन पुरुष डॉक्टरांची नियुक्ती, परिचारिकांच्या २४ रिक्त पदांचे भरतीकरण, दोन सुरक्षारक्षक, डॉक्टरांसाठी रहिवासी संकुल या गोष्टींसाठी तातडीने कृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.