• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलरला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे आंबेवाडीत मोठा अनर्थ टळला

ByEditor

Feb 18, 2026

कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत मंगळवारी सकाळी एका धावत्या ट्रेलरने अचानक पेट घेतल्याने खळबळ माजली. मात्र, ट्रेलर चालकाने दाखवलेल्या विलक्षण प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, बाजारपेठेतील संभाव्य हानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी १० वाजेच्या सुमारास ट्रेलर (क्रमांक: MH 14 JU 6659) खांब बाजूकडून विळा भागाड येथील पोस्को कंपनीकडे स्टील कॉईल घेऊन जात होता. आंबेवाडी बाजारपेठेतील वाघमारे चहा स्टॉलसमोर हा ट्रेलर आला असता, अचानक इंजिनमधून धूर निघून केबिनने पेट घेतला.

धावत्या वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने डोकं शांत ठेवत वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवले. त्याने तातडीने खाली उतरून वाघमारे चहा स्टॉलमधून पाणी आणले आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वेळेत आग विझवल्यामुळे केबिनचा पूर्ण कोळसा होण्यापासून वाचला आणि बाजूला असलेल्या दुकानांनाही झळ बसली नाही.

या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर कोलाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!