स्थानिक कामगारांचा संताप; कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने
उरण । घन:श्याम कडू
उरणमधील न्हावा येथे कार्यरत असलेला ओएनजीसीचा सप्लाय बेस प्रकल्प गुजरातमधील पिपावाव येथे हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे सुमारे ६०० स्थानिक कामगार बेरोजगार होण्याची शक्यता व्यक्त होत असून, मंगळवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
जेएनपीए बंदरालगत ४५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला न्हावा सप्लाय बेस हा ‘मुंबई हाय’ येथील तेल व गॅस विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. सुमारे १०० ते १२५ किलोमीटर सागरी अंतरावर असलेल्या विहिरींपर्यंत अवजड यंत्रसामग्री, पाइप, सिमेंट व इतर साहित्य जहाजांद्वारे याच ठिकाणाहून पाठवले जाते.
मात्र हा प्रकल्प गुजरातला हलविण्याचे निर्देश ओएनजीसीच्या नियोजन व परिवर्तन विभागाचे अध्यक्ष अजय कुमार सिंग यांनी दिल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याच्या निषेधार्थ सुमारे ६०० कामगारांनी कंपनीसमोर घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने कामगारांशी चर्चा करावी, सर्वांच्या नोकऱ्यांची हमी द्यावी आणि स्थानिक रोजगारावर गदा येणार नाही, याची स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात कंपनीकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उरणमधील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प बाहेर जाणार का, या प्रश्नाने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
