आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा; तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
पेण | विनायक पाटील
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ मधील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांनी कंबर कसली आहे. प्रभागातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांबाबत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या समस्यांबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ठाणा नाका सिग्नल येथील वाहतूक कोंडीवर तोडगा
वाढत्या शहरीकरणामुळे गार्डन हॉटेल सिग्नल आणि ठाणा नाका परिसर वर्दळीचा बनला आहे. रस्ता अरुंद असल्याने एनएमएमटी बसेस आणि अवजड वाहनांना वळण घेताना मोठी कसरत करावी लागते, ज्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूने नियोजनबद्ध रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी नगरसेविका म्हात्रे यांनी लावून धरली आहे.
पाडा मोहल्ला व भुसार मोहल्ल्यात नागरी कामांचा धडाका
प्रभागातील पाडा मोहल्ला आणि भुसार मोहल्ला परिसरात अनेक कामे प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने याकूब बेग हायस्कूल ते कच्छी मोहल्ला दरम्यान नाल्याची स्वच्छता करून नवीन बांधकाम व स्लॅब टाकणे, तुटलेली गटारे, चेंबर दुरुस्ती आणि सार्वजनिक शौचालयांच्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे, अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवणे आणि आवश्यक तिथे काँक्रिटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.
पाणी प्रश्नावर ‘ऑन द स्पॉट’ निकाल
महर्षी वाल्मिकी नगर येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. पाहणी दौऱ्यादरम्यान ममता म्हात्रे यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि लाईनमनला पाचारण केले. यापुढे पाणीपुरवठा ठराविक वेळेत आणि योग्य दाबाने करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
“प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सूचनेनुसार आज अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर आणि दर्जेदार मिळणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. रस्ता रुंदीकरण, नालेसफाई किंवा पाणीपुरवठा; प्रत्येक काम पारदर्शक पद्धतीने पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील. लोकहितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
-ममता प्रितम म्हात्रे, नगरसेविका
या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तक्रारींची दखल घेत लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले आहे.
