तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन; ग्रामीण भागातील बालकांसाठी सुवर्णसंधी
दिघी । गणेश प्रभाळे
ग्रामीण भागातील बालकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी बोर्ली पंचतन येथे विशेष ‘बालरुग्ण सुपर स्पेशालिस्ट आरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजेश पाचरकर मित्र फाउंडेशनच्या पुढाकाराने हे शिबिर रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरात मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, माणगाव, महाड आणि अलिबाग येथील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बालरोग, अस्थिरोग (Orthopedic), बालशस्त्रक्रिया (Surgery), नेत्ररोग आणि न्यूरोलॉजी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत तपासणी व उपचार सल्ला दिला जाईल.
या आजारांवर होणार विशेष निदान
ग्रामीण भागात आर्थिक ओढाताण आणि तज्ज्ञांच्या अभावामुळे अनेक बालकांचे आजार दुर्लक्षित राहतात. ही अडचण ओळखून शिबिरात खालील समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल:
शस्त्रक्रिया विभाग: फिमोसिस, हर्निया, हायड्रोसील, लिम्फ नोड, लिपोमा आणि सिस्ट.
नेत्ररोग विभाग: भेंगडेपणा, लेझी आय (Lazy Eye), जन्मजात मोतीबिंदू व चष्म्याचा नंबर तपासणी.
न्यूरोलॉजी व वर्तन समस्या: ऑटिझम, एडीएचडी (ADHD), अपस्मार (फिट्स), मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि विकासातील विलंब.
अस्थिरोग: जन्मजात पाय वाकडे असणे (Clubfoot), धनुष्य पाय (Bow legs) व सेरेब्रल पाल्सी.
“वेळेवर निदान न झाल्याने अनेकदा बालकांमधील आजार बळावतात. ग्रामीण भागातील पालकांना आर्थिक कारणास्तव शहरात जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे शिबिर एक आधारवड ठरेल.”
— आयोजक, डॉ. राजेश पाचरकर मित्र फाउंडेशन
समस्या का बळावते?
तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, आर्थिक टंचाई आणि पालकांमधील जागरूकतेच्या कमतरतेमुळे बालकांच्या आजारांचे वेळेवर निदान होत नाही. परिणामी, साध्या उपचाराने बरे होणारे आजार पुढे गंभीर स्वरूप धारण करतात. हे टाळण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांची या शिबिरात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
