• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दि. बा. पाटील नामकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘जनसागर’ धडकणार

ByEditor

Feb 19, 2026

विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी केंद्राचा निर्णय प्रलंबित; भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट

उरण । घन:श्याम कडू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी, या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी असून, या मागणीसाठी सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय नामकरण कृती समितीने केला आहे.

प्रवासी वाहतूक सुरू, पण नाव मिळेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे दिमाखात उद्घाटन झाले होते. त्यानंतर २५ डिसेंबर २०२५ पासून या विमानतळावरून नियमित प्रवासी वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. “विमानतळ ज्या भूमीवर उभा आहे, त्या भूमिपुत्रांच्या भावनांचा आणि बलिदानाचा सन्मान राखत केंद्र सरकारने तातडीने नामकरणाचा निर्णय घ्यावा,” अशी आग्रही मागणी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केली आहे.

सहा जिल्ह्यांतून कार्यकर्त्यांची एकजूट

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक या सहा जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. २३ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत ठिय्या मांडण्याचा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला.

“आम्ही आमची जमीन दिली, आमची स्वप्ने दिली. आता आमच्या लोकनेत्याच्या नावासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर हे दुर्दैव आहे. सोमवारी आझाद मैदानात लोकशक्तीचा आविष्कार दिसेल.”

— सर्वपक्षीय नामकरण कृती समिती

आंदोलनाचा इशारा

समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर केंद्र सरकारने या आंदोलनानंतरही तातडीने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर अधिक तीव्र करण्यात येईल. सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि दि. बा. पाटील यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!