घनःश्याम कडू
उरण, दि. ११ जुलै : उरण तालुक्यातील वाढते वीज बिल, आदानी मीटरची जबरदस्ती, वारंवार होणारे वीज खंडन, वीज तारा व पोलची दुरवस्था आणि अधिकाऱ्यांचा गैरउत्तरदायित्व यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अखेर ‘उरण वीज कार्यालयावर’ थेट धडक दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केले. त्यांच्यासह उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, दीपक भोईर, विनोद म्हात्रे, बी.एन. डाकी, सरपंच भास्कर मोकल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा जमाव कार्यालयात दाखल झाला.

शिष्टमंडळाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा करत समस्यांचे निवेदन सादर केले. गायकवाड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे थोडा वेळ देण्याची विनंती केली. तसेच सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेत ३० जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, “मोबाईल फोन सतत चालू ठेवून नागरिकांच्या तक्रारी तत्काळ ऐकून घेऊन सोडवाव्यात.” ही भूमिका काहीशा दिलासादायक ठरली.
यावेळी खोपटे ग्रामपंचायत हद्दीतील एका वादग्रस्त प्रकरणाचा उलगडा झाला. त्या भागातील शासकीय वीजकाम सरपंचाने थांबविल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. यावर “सामान्य नागरिकांनी काम अडवल्यास कारवाई होते, लोकप्रतिनिधींवर तीच तातडी का नाही?” असा सवालही उपस्थितांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला.
माजी आमदार भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “गायकवाड साहेबांची विनंती मान्य करून आज मोर्चा न आणता चर्चा केली. पण ३० जुलैपर्यंत प्रश्न सुटला नाही, तर १ ऑगस्टपासून ‘शिवसेना स्टाईल’ने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात वीज खात्याच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला असून, प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे.