प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरात अवैध चरस विक्रीचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २९ जून रोजी शिघ्रे चेक पोस्टवर तपासणी दरम्यान सुरू झालेल्या तपासातून एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून १३ लाख ६१ हजार रुपये किमतीचा सुमारे २ किलो ६५९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे.
स्कुटीमधून चरस वाहतूक
तपासणी दरम्यान अलवान निसार दफेदार (वय १९, रा. सिध्दी मोहल्ला, मुरुड) व राजू खोपटकर (रा. गावदेवी पाखाडी, मुरुड) हे स्कुटी (MH-48 BK 9251) वरून जात होते. पोलिस पाहताच राजू खोपटकरने पलायन केल्याने स्कुटीची तपासणी करण्यात आली आणि डिकीत ७७६ ग्रॅम चरस सापडले. अलवानला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, अवैध विक्रीचे रॅकेट उघड झाले.
आरोपींची साखळी उघड
अलवानच्या माहितीवरून मुख्य डिलर विशाल रामकिशन जैसवाल (रा. उत्तर प्रदेश) व अन्य आरोपी अनुप व अनुज जैसवाल, आशिष डिगे, प्रणित शिगवण, आनस कबले, वेदांत पाटील, साहिल नाडकर, अनिल पाटील, सुनिल शेलार, माखनसिंग भगेल व राजू खोपटकर यांची नावे समोर आली.
मुख्य डिलर आरोपी विशाल जैसवाल उत्तर प्रदेश व नेपाळमधून चरस आणत होता. अनुप व अनुज जैसवाल यांच्या माध्यमातून आशिष डिगे व प्रणित शिगवण यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर विक्री केली जात होती.
या कारवाईचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, पो.नि. परशुराम कांबळे, सपोनि विजयकुमार देशमुख यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी केला. गुन्ह्याच्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.