घनश्याम कडू
उरण, दि. ११ : कस्टम चाळ ते द्रोणागिरी माता मंदिर मार्गावरील खाजगी जमिनीवर कोणतीही मंजुरी न घेता सुरू केलेली अफकॉन्स कंपनीची डंपर वाहतूक अखेर जमीन मालकांच्या तीव्र विरोधामुळे थांबवावी लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड डंपर वाहतूक सुरू होती. मात्र त्या परिसरातील जमिनी खासगी मालकीच्या असून जमीनधारकांच्या कोणत्याही पूर्वसंमतीशिवाय ही वाहतूक सुरू असल्याने कायद्याचा उल्लंघन झाला.

वाहतूक अव्यवस्थित व धोकादायक पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक व जमिनमालकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. खासगी मालकांनी या भूमिकेला विरोध करत कंपनीला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, जमीनधारक, अफकॉन्स कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांच्यात चर्चा झाली. जमिनमालकांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने कंपनीला तात्काळ वाहतूक थांबवावी लागली.
या प्रकारामुळे अनधिकृत व्यवसायिक क्रियाकलापांबाबत स्थानिक जनतेचा विरोध अधिकच तीव्र होत असून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस धोरणांची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.