• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मच्छीमारांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : महेंद्रशेठ घरत यांचा कोळी समाजाला सल्ला

ByEditor

Jul 11, 2025

विठ्ठल-रखुमाई सहकारी संस्थेचे उद्घाटन; मत्स्य व्यवसायात नव्या पायाभूत दृष्टिकोनाचा आग्रह

विठ्ठल ममताबादे
उरण :
“पूर्वीची मासेमारी आता राहिलेली नाही, काळ बदलतोय आणि तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलेच पाहिजे,” असा सल्ला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कोळी समाजाला दिला.

गुरुवारी (ता. १०) उलवे नोडमध्ये विठ्ठल-रखुमाई मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी समुद्र किनाऱ्यांवरील भराव आणि निसर्गाच्या विरोधात होणाऱ्या विकास कामांबाबतही चिंता व्यक्त केली.

“निसर्गाच्या नादी लागू नये” — घरत यांचा इशारा

महेंद्रशेठ घरत म्हणाले, “विकासाच्या नावाखाली समुद्राला हटवण्याचे प्रकार सुरू आहेत, जेवढा भराव कराल त्यापेक्षा दुप्पट वेगाने समुद्र आपल्याला गिळेल. गणेशपुरीचे उदाहरणच घ्या — कोळी वस्ती आता काँक्रिटच्या जंगलात स्थलांतरित झाली आहे.” त्यांनी अधिकाऱ्यांवरही टीका करत म्हटले, “वातानुकूलित दालनात बसून नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोळ्यांचा मनस्ताप कळणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “एकत्र या, नवीन जेट्टीसाठी प्रयत्न करा. मी गणेशपुरी ग्रामस्थांच्या मागे उभा आहे. सिडकोसोबत संघर्ष करून त्यांना घरे मिळवून दिली, पुढेही साथ देईन.”

या कार्यक्रमात अलिबागचे मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी कोळी समाजाला शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. “स्पर्धा वाढतेय, अभ्यास दौरे काढा, पालघर-सातपाटीच्या सोसायट्यांकडून शिका,” असे त्यांनी सांगितले. कोकणी मच्छीमार महिलांसाठीच्या योजनाही त्यांनी नमूद केल्या.

महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी स्पष्ट केले की, “महेंद्रशेठ घरत यांच्या प्रेरणेतून ही संस्था सुरू झाली. गुरुपौर्णिमेनिमित्त हीच त्यांना खरी भेट.” त्यांनी घरत यांच्या नेतृत्वात सिडकोविरुद्ध लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास मत्स्य परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे, संस्थेचे अध्यक्ष परशुराम डोलकर, साई संस्थानचे रविशेठ पाटील, राजेंद्र पाटील, विजय शिरढोणकर, सुजित मोकल, रुपेश मोहिते, सुगंधा कोळी, नयना कोळी, जोमा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!