अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सशक्त आणि बहुचर्चित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अध्यक्ष महमद मेमन यांनी आपल्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेमन हे १९८० पासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी काँग्रेस (आय) पक्षातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. बॅ. ए. आर. अंतुले, स्व. रविंद्र राऊत आणि अब्दुल सत्तार अंतुले यांच्यासह त्यांनी कार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील निवडणुकांमध्ये त्यांचे संघटन कौशल्य विशेष ठरले. बोर्ली पंचतन विभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. पक्षीय असो वा सर्वपक्षीय, मेमन यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध राखले.
वैयक्तिक, व्यवसायिक आणि प्रकृतीशी संबंधित कारणांमुळे यापुढे सक्रिय राजकारणात वेळ देता येणार नाही, अशी स्पष्टता त्यांनी दिली असून कोणताही खंतभाव किंवा नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येत असताना मेमन यांच्या निवृत्तीने कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाची निवड होणार की मेमन यांची मनधरणी केली जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.