सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव बस स्थानक हे रायगड जिल्ह्यातील वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असून आता ते नव्या स्वरूपात सादर होण्याच्या मार्गावर आहे. १९८२ मध्ये उभारले गेलेले हे बस स्थानक सध्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेत असून प्रवासी सुविधांचा स्तर उंचावला जात आहे.
नवीन नूतनीकरणात एकूण १२ प्लॅटफॉर्मसह स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या ८ प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक प्रशस्त आणि सुरक्षित असलेले हे नवे प्लॅटफॉर्म गणेशोत्सव व सण-उत्सव काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला समर्थपणे हाताळणार आहेत.
बस चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृहांचे नूतनीकरण, प्रसाधनगृहात सुधारणा, गरम पाण्याची व्यवस्था, स्थानकाचे प्लास्टरिंग, रंगकाम आणि पूर्ण विद्युतीकरण यांसह कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
विशेष बाब म्हणजे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे, ज्यामुळे बस आगमन, प्रस्थान आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होणार आहे. प्रवाशांना वेळेवर व अचूक माहिती मिळवण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे.
माणगाव बसआगार, जो २०११ मध्ये बांधण्यात आला, त्याचे क्षेत्रफळ १९२७८ चौरस मीटर असून बस स्थानकाच्या (९४५० चौरस मीटर) समन्वयाने चालणारे हे नूतनीकरण माणगावच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती देणारे ठरेल.
कोकणात उत्सव काळात लाखो भाविकांचा प्रवास माणगाव मार्गे होतो. त्यामुळे सुसज्ज आणि सुरक्षित बस स्थानक ही काळाची गरज बनली आहे. आगामी गणेशोत्सव अवघ्या ४५ दिवसांवर असल्याने कामे तत्परतेने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
नव्या रूपातले माणगाव बस स्थानक केवळ प्रवासी केंद्र न राहता, रायगड जिल्ह्याच्या आदर्श सुविधा केंद्रांपैकी एक म्हणून उभे राहणार आहे – असा विश्वास नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.