घरासमोर नारळ, कुंकू, भोपळा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महाड । मिलिंद माने
विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेले तथाकथित “ओम फट स्वाहा” प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर याच प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास अवघे काही दिवस शिल्लक असताना चवदार तळे परिसरात सापडलेल्या संशयास्पद अघोरी साहित्याने नागरिकांमध्ये भीतीची लाट निर्माण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चवदार तळे परिसरातील ट्युलिप नावाच्या इमारतीसमोर पहाटे नागरिकांना रस्त्यावर नारळ फोडलेला, लाल कुंकू, काही तांत्रिक/तांत्रिक कृतींमध्ये वापरले जाणारे साहित्य दिसून आले. याशिवाय लाल भोपळ्यावर कुंकू आणि काळी बाहुली ठेवलेलीही स्वतंत्र वस्तूही आढळली. वस्तूंचे स्वरूप पाहता त्या अघोरी कृत्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनांची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांमध्ये भीड-भयाचे वातावरण निर्माण झाले. घराबाहेर पडणाऱ्यांपासून परिसरातील दुकानदारांपर्यंत या प्रकाराची जोरदार चर्चा रंगू लागली असून हे कृत्य थेट निवडणूक तणावाशी संबंधित असल्याचा कयास नागरिक बांधू लागले आहेत.
प्रचार तापला, अघोरी कृतींनी वाढली अस्वस्थता
महाड नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून विविध पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. अशा संवेदनशील काळात आढळलेले हे अघोरी साहित्य नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही स्थानिक नेत्यांनीही या प्रकाराला “चिथावणीखोर आणि दिशाभूल करणारा” ठरवत त्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी व भाजप पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाकडे तसेच पोलिस प्रशासनाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीच्या काळात अशा कृतींमुळे राजकीय वातावरण दूषित होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रायगड जिल्ह्यात बुवाबाजीचे प्रकार
दरम्यान, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड विभागात काही बुवा-बाबा फार्महाऊसवर अघोरी कृत्ये करीत असल्याचेही नागरिकांनी पाहिल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याच्या बातम्या आल्याने, आता पुन्हा त्याच पद्धतीची पुनरावृत्ती होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अघोरी कृत्यांच्या या साखळीमुळे निवडणूक काळात भीती पसरवणे, अंधश्रद्धा वाढवणे आणि वातावरण दूषित करणे हे चिंताजनक असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
“नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांतही असे प्रकार सुरू राहणार का?” असा सवाल नागरिकांतून वारंवार उपस्थित केला जात आहे.
घटनेचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागांनी चौकशी करून अशा प्रकारांवर अंकुश ठेवावा, निवडणुकीदरम्यान कोणतीही भीतीजनक किंवा अंधश्रद्धा पसरवणारी कृत्ये होऊ नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
