दहा दिवसांतील दुसरी घटना; व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
कोलाड । विश्वास निकम
रोहा तालुक्यातील आंबेवाडी बाजारपेठेत चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) मध्यरात्री एका दुकानाचे शटर तोडून रोख रकमेसह सिगारेटचा साठा लंपास केला. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेवाडी बाजारपेठेतील महादेव अंबाजी लोखंडे यांच्या ‘जनता पान सेंटर’ या दुकानाला चोरट्यांनी लक्ष केले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील १५०० रुपये रोख आणि साधारण ३५०० रुपये किमतीचा सिगारेटचा माल असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
आंबेवाडी बाजारपेठेत चोरी होण्याची ही १० दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी बुधवार, २८ जानेवारी रोजी देखील एका व्यापाऱ्याचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. एकीकडे बाजारपेठेत आर्थिक मंदीचे सावट असताना, दुसरीकडे अशा पद्धतीने दुकाने फोडली जात असल्याने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
“दिवसेंदिवस रोहा तालुक्यात चोरीच्या घटना वाढत आहेत. आंबेवाडी बाजारपेठेत सतत होणाऱ्या या प्रकारांमुळे रात्रीच्या वेळी दुकाने सुरक्षित ठेवायची कशी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.”
— स्थानिक व्यापारी, आंबेवाडी.
या घटनेमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
