• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची? शेकापची ‘घरघर’ आणि शिवसेनेचे विभाजन; राष्ट्रवादी-भाजप युती बाजी मारणार?

ByEditor

Jan 14, 2026

​महाड | मिलिंद माने
रायगड जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी सत्तेचा सारीपाट पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला लागलेली ‘घरघर’ आणि शिवसेनेतील उभय उभ्या फुटीचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत आहे. जिल्ह्याचे आगामी राजकारण आता याच दोन पक्षांभोवती फिरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

​बदललेली राजकीय समीकरणे

​मागील पंचवार्षिक निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होती. तत्कालीन अध्यक्ष म्हणून आदिती तटकरे यांनी काम पाहिले होते. मात्र, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या विजयानंतर विधानसभेतही महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्यात सध्या भाजपचे ३, शिवसेना शिंदे गटाचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ असे एकूण ७ आमदार आहेत.

​शेकाप आणि शिवसेनेची कोंडी

​शेकाप: एकेकाळी २३ सदस्य संख्याबळ असलेला शेकाप आज अस्तित्वाची लढाई लढत आहे. जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने आणि पक्षाला लागलेली गळती पाहता, शेकाप पुन्हा पूर्वीसारखे संख्याबळ मिळवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित केली जात आहे.

​शिवसेना: शिवसेनेत झालेल्या दोन गटांमुळे मतांचे विभाजन अटळ आहे. शिंदे गटाचे ३ आमदार असले तरी, उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वामुळे शिंदे गटाला स्वबळावर मोठे यश मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे.

​भाजप-राष्ट्रवादीचा वाढता आलेख

​राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर रायगडच्या राजकारणात भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. माजी आमदार धैर्यशील पाटील यांची राज्यसभा खासदार म्हणून झालेली निवड, निरंजन डावखरे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील विजय यामुळे भाजप आता ‘एक अंकी’ आकड्यावरून थेट ‘दोन अंकी’ आकडा गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे, मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या माध्यमातून सत्तेचा पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपची पकड मजबूत झाली आहे.

​सत्तेचा नवा फॉर्म्युला?

​नुकत्याच झालेल्या १० नगरपरिषदांच्या निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेना-भाजप तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी-भाजप अशी युती पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या मागील समीकरणात शेकाप किंगमेकर होता, मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शेकापला दूर सारून भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

​थोडक्यात संख्याबळ (मागील निवडणूक):

​शेतकरी कामगार पक्ष: २३
​शिवसेना (अविभाजित): १८
​राष्ट्रवादी काँग्रेस (अविभाजित): १२
​भाजप: ०३
​काँग्रेस: ०३

आजच्या घडीला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ प्राप्त करतील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचा ‘गड’ यंदा भाजप-राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची दाट शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!