पारंपरिक पालख्या, उंच सासनकाठ्या आणि ‘चांगभलं’च्या जयघोषाने भक्तीचा महापूर; दोन दिवसांची ‘मोडजत्रा’ आकर्षणाचे केंद्र
महाड | मिलिंद माने
दक्षिण रायगडमधील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक महाडचा ‘छबिना उत्सव’ १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्री वीरेश्वर महाराजांच्या या उत्सवात मध्यरात्री निघालेल्या देवदेवतांच्या पालख्या, उंचच उंच सासनकाठ्या, ढोल-नगाऱ्यांचा गजर आणि ‘चांगभलं’च्या आवाजाने महाड शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले. या सोहळ्यासाठी महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

विन्हेरेच्या झोलाई देवीचे शाही आगमन
छबिना उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विन्हेरे येथील श्री झोलाई देवीची पालखी. १८ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा भोई घाटावर देवीच्या पालखीचे आगमन होताच भाविकांनी एकच गर्दी केली. खालुबाजा आणि नगाऱ्यांच्या तालावर ‘श्री झोलाई देवीचं चांगभलं’चा गजर आसमंतात घुमला. मध्यरात्रीच्या सुमारास या पालखीचे स्वागत करण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता.
वीरेश्वर मंदिरात पालख्यांचा मेळा
रात्री ११ वाजल्यापासून महाडच्या बाजारपेठेतून विविध गावांच्या पालख्या दाखल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने नाते येथील रवळनाथ, मांडलेचा भैरवनाथ, सवची मानाई, गोठेची जाकमाता, चोचिंद्याची पद्मवाती, मुठवलीची जनाई आणि शिरगावचा भैरवनाथ या पालख्यांचा समावेश होता. प्रत्येक पालखीसोबत असलेल्या उंच सासनकाठ्या नाचवत तरुण मंडळींनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. वीरेश्वर मंदिर प्रशासनाकडून सर्व पालखी भोईंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
भंडाऱ्याची उधळण आणि पारंपरिक गोंधळ
मध्यरात्री ३ च्या सुमारास सर्व पालख्यांचे वीरेश्वर मंदिरात आगमन झाल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर कोटेश्वरी मंदिराच्या साक्षीने पारंपरिक ‘गोंधळ’ घालण्यात आला. राम काकडे व ज्ञानेश्वर काकडे यांनी संबळीच्या कडक हातांनी सादर केलेल्या गोंधळाने आणि हळदीच्या (भंडारा) उधळणीने संपूर्ण मंदिर परिसर सुवर्णमयी झाला होता. यावेळी मशालींच्या प्रकाशात भाविकांनी देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
मुख्य छबिना आणि नगर प्रदक्षिणा
पहाटेच्या सुमारास वीरेश्वर महाराजांच्या मुखवट्याला पारंपरिक फेटा आणि पगडी चढवून सजवण्यात आले. त्यानंतर सर्व पालख्यांनी गाडीतळाकडे प्रस्थान केले. या परिक्रमेत झोलाई देवीची पालखी अग्रस्थानी होती. सूर्योदयाच्या वेळी वीरेश्वर महाराज आणि रवळनाथाची पालखी एकत्र नाचविण्याचा सोहळा पाहण्यासारखा होता. सकाळी १० वाजेपर्यंत ही नगर प्रदक्षिणा सुरू होती, ज्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली.

मोडजत्रा: खरेदी आणि मनोरंजनाची पर्वणी
छबिना संपला तरी महाडचा उत्साह कमी झालेला नाही, कारण आता दोन दिवसांच्या ‘मोडजत्रे’ला सुरुवात झाली आहे. आकाशपाळणा, टोरा-टोरा, ब्रेक डान्स, मौत का कुंआ आणि जादूगारांच्या प्रयोगांनी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना भुरळ घातली आहे. पूर्वी या जत्रेत फक्त वर्षभराचे किराणा साहित्य (मिरची, गूळ, कांदा) मिळत असे. मात्र, आता सोलापूरची चादर, सौंदर्य प्रसाधने, मातीच्या वस्तू आणि गृहोपयोगी वस्तूंची कोट्यवधींची उलाढाल येथे होत आहे. या जत्रेत हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात, जे महाडच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानले जाते.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
लाखोंच्या या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. नगरपालिका आणि महसूल विभागही या ६-७ दिवसांच्या काळात ‘ॲक्शन मोड’वर असून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
