मुंबई: नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. ‘स्प्राउट्स न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील ‘खरात फाइल्स’ समोर आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमके प्रकरण काय?
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ‘शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष अशोक खरात याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याकडे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, तो अंधश्रद्धेचा आधार घेऊन महिलांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आता आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन केली आहे.
शिंदेंशी असलेला संबंध चर्चेत
नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह खरात याच्या ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
विरोधकांनी असा आरोप केला आहे की, खरात याचे अनेक बड्या नेत्यांशी जवळचे संबंध होते आणि याच प्रभावाचा वापर करून त्याने आपली काळी कृत्ये लपवली होती. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सवाल केला आहे की, “गृहखाते एकनाथ शिंदे यांचा सीडीआर (CDR) तपासण्याचे धाडस दाखवणार का?”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘खरात फाइल्स’मध्ये अशोक खरात आणि राज्यातील काही बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे असण्याची शक्यता आहे. या फाईल्स सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचल्याची चर्चा असून, यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
“दीपक केसरकर दर महिन्याला खरातकडे जात होते. या प्रकरणात शिंदेंचा हस्तक्षेप होता का? याची चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
अशोक खरात याच्या अटकेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी काय निष्पन्न करते आणि ‘खरात फाइल्स’मधून कोणाकोणाचे चेहरे उघड होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
