• Thu. Apr 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये विकासाचे धिंडवडे; उड्डाणपुलाला उद्घाटनानंतर काही महिन्यांतच भगदाड!

ByEditor

Apr 2, 2026

जसखारजवळ पुलाचा भाग खचला; प्रशासनाची बेफिकीरी आणि भ्रष्टाचाराचा ‘जिवंत नमुना’ समोर

उरण । घन:श्याम कडू
करळ फाटा ते जेएनपीए मार्गावरील उड्डाणपूल हा विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मोठ्या गाजावाजात उद्घाटन होऊन काही महिने उलटत नाहीत, तोच जसखार गावाजवळ मंदिरालगत पुलाला भलेमोठे भगदाड पडले आहे. “काम सुरू, कमिशन सुरू आणि काही महिन्यांतच खड्डा तयार” हीच वस्तुस्थिती समोर आल्याने उरणकरांमधून संताप व्यक्त होत आहे.

‘मलमपट्टी’ उघडी पडली

आयात-निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी उभारण्यात आलेला हा पूल आता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज जड वाहनांची वर्दळ असताना पुलाचा भाग खचणे ही तांत्रिक चूक नसून सरळसरळ निष्काळजीपणाचा परिणाम आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही पुलावर ठिकठिकाणी मलमपट्टी केल्याचे दिसून येत आहे. दोष माहिती असूनही तो झाकण्याचा प्रयत्न झाला का? असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जत्रोत्सवाच्या तोंडावर सुरक्षेचा प्रश्न

पुलाच्या बांधकामावेळी जसखार येथील श्रद्धास्थान श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता, त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता काही दिवसांवरच देवीचा जत्रोत्सव असून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मनसे आक्रमक; राज ठाकरेंकडे धाव

पुलाच्या निकृष्ट कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी मंगेश वाजेकर यांनी सांगितले की, “हा सर्व प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल. दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईसाठी त्यांची भेट घेणार आहोत.”

“ब्लॅकलिस्ट नव्हे, गुन्हे दाखल करा!”

केवळ ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून प्रशासनाला आपले हात झटकता येणार नाहीत. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जनतेकडून होत आहे. या प्रकरणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएनपीए प्रशासनाने बाळगलेले मौन संशयास्पद आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!