मंगेश पत्की (संपादक, रायगड जनोदय)
नागोठणे शहराचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा नुकताच पार पडला. परंपरेनुसार शुक्रवारी निघालेली पालखी सोमवारी आपल्या मंदिरात परतली. भक्तीचा हा ओघ साडेतीन दिवस शहराच्या कानाकोपऱ्यात वाहत होता, पण या भक्तीच्या प्रवाहात ‘शिस्तीचा’ आणि ‘पावित्र्याचा’ किनारा मात्र कुठेतरी हरवलेला दिसला.
भक्तीवर डीजेचा वरचष्मा
एकेकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि आईच्या जयघोषात निघणारी पालखी आता ‘हाय-व्होल्टेज’ डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आहे. नागोठण्यातील प्रत्येक आळीमध्ये ढोल-ताशांच्या जोडीला डीजेचा कर्णकर्कश आवाज घुमत होता. पालखी समोर गेल्यावर भक्तीभावाने नतमस्तक होण्याऐवजी, तासनतास एकाच जागी थिरकणाऱ्या तरुणाईमुळे पालखीचा प्रवास कमालीचा रेंगाळला. दरवर्षीपेक्षा यंदा पालखीला मंदिरात पोहोचायला लागलेला विलंब हा भक्तीमुळे नसून, रस्ते अडवून चाललेल्या नृत्यामुळे होता, हे वास्तव नाकारता येणार नाही.
नशेचा विळखा आणि हरवलेले पावित्र्य
या सोहळ्याचे सर्वात विदारक चित्र म्हणजे उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला तरुणाईचा उन्माद. प्रत्येक आळीमध्ये नशा केलेल्या तरुणांची हुल्लडबाजी उघड्या डोळ्यांनी दिसत होती. ज्या पालखी सोहळ्यात सात्विकता असायला हवी, तिथे अमली पदार्थांच्या प्रभावाखाली नाचणारी तरुणाई पाहून ‘हा खरोखरच धार्मिक उत्सव आहे का?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“श्रद्धेच्या ठिकाणी व्यसनाला स्थान नसावे. जेव्हा तरुण नशेत धिंगाणा घालतात, तेव्हा त्या देवतेचा सन्मान राखला जातो की अपमान, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.”
प्रशासन आणि कमिटीची हतबलता
उत्सव कमिटीने हा सोहळा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न केले असतीलच, परंतु या ‘उन्मादी’ गर्दीसमोर कमिटीचे सदस्य हतबल झालेले पाहायला मिळाले. दुसरीकडे, पोलीस यंत्रणेने घेतलेली मवाळ भूमिका या धिंगाण्याला खतपाणी घालणारी ठरत आहे. जर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात या उत्सवाला केवळ एका ‘इव्हेंट’चे स्वरूप येईल आणि त्यातील आध्यात्मिक अधिष्ठान पूर्णपणे नष्ट होईल.
उत्सव साजरा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण तो इतरांना त्रास देऊन किंवा परंपरेचे पावित्र्य धाब्यावर बसवून नसावा. नागोठणेकरांनी एकत्र येऊन आता विचार करण्याची वेळ आली आहे. पुढच्या वर्षीचा पालखी सोहळा हा ‘डीजे आणि नशा’ मुक्त होऊन पुन्हा एकदा श्रद्धेच्या आणि शिस्तीच्या वातावरणात साजरा व्हावा, हीच आई जोगेश्वरीच्या चरणी खरी सेवा ठरेल.
| ८३ तासांचा ‘विक्रमी’ प्रवास: भक्ती की वेळेचा अपव्यय? शुक्रवारी सकाळी मंदिरातून मार्गस्थ झालेली आई जोगेश्वरीची पालखी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली. सलग ८३ तास चाललेला हा सोहळा म्हणजे नागोठण्याच्या इतिहासातील एक प्रदीर्घ काळ ठरला आहे. या सोहळ्यात पोलिसांची यंत्रणा आणि उत्सव कमिटीचे स्वयंसेवकही थकून जातात. याचाच फायदा घेत नशेत असलेले तरुण अधिक धुडगूस घालतात. पालखी सोहळा हा ‘भक्तीचा उत्सव’ असावा, ‘शक्तीप्रदर्शनाचा आखाडा’ नव्हे. जर पालखीला आपल्याच गावात फिरण्यासाठी साडेतीन दिवसांचा कालावधी लागत असेल, तर त्यातील गांभीर्य कुठेतरी हरवत चालले आहे. ८३ तासांच्या या थकवणाऱ्या प्रवासानंतर जोगेश्वरी मातेचे मंदिरात आगमन होताना जे चैतन्य असायला हवे, ते हुल्लडबाजीमुळे काळवंडलेले दिसले. |
