प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय? पिरवाडी किनारा बनला नशेचा अड्डा; पालकांमध्ये संतापाची लाट
उरण | घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील तरुणाई सध्या अमली पदार्थांच्या भयंकर विळख्यात सापडली असून, शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याचे चित्र समोर आले आहे. शाळा-कॉलेजच्या ५०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही, उरण शहरात सिगारेट, गुटखा, चरस आणि गांजा यांसारख्या नशिल्या पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. प्रशासनाच्या या ‘कारवाईशून्य’ भूमिकेमुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळा प्रशासनाकडून ‘गांजा’ प्रकरणावर पडदा
उरणमधील एका नामांकित शिक्षण संस्थेत एका विद्यार्थ्याच्या खिशात गांजा सापडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. मात्र, शाळेची प्रतिमा जपण्याच्या नावाखाली प्रशासनाने या गंभीर प्रकारावर पडदा टाकला. प्रशासनातील एका जबाबदार व्यक्तीने यावर बोलण्यास नकार दिला, तर दुसऱ्याने “नशिली वस्तू नव्हती” अशी सारवासारव करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना शाळा प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिरवाडी किनारी शालेय विद्यार्थ्यांची नशा
पिरवाडी समुद्रकिनाऱ्याचे दृश्य तर अधिकच विदारक आहे. सकाळी शाळेच्या गणवेशातच विद्यार्थी-विद्यार्थिनी हातांत दारूच्या बाटल्या, तोंडात गुटखा आणि सिगारेट घेऊन नशेत धुंद असल्याचे पाहायला मिळते. किनाऱ्यावरील बेकायदेशीर टपऱ्या आता तरुणाईच्या नशेचे अड्डे बनले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका प्राचार्यांच्या मुलीने नशेत वाहन चालवून अपघात केला होता, मात्र विनापरवाना वाहन चालवत असूनही तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून ‘बड्या’ लोकांसाठी कायदे शिथिल आहेत का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
“आम्ही हप्ता देतो”; टपरीवाल्यांची मुजोरी
शहरातील अनेक टपऱ्या पोलीस ठाणे आणि शाळांपासून केवळ १०० मीटर अंतरावर आहेत. आश्चर्य म्हणजे, “आम्ही अधिकाऱ्यांना हप्ता देतो, त्यामुळे आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही,” अशी दर्पोक्ती हे टपरीवाले खुलेआम करत असल्याचे नागरिक सांगतात. दिवसाला लाखो रुपयांची नशिल्या पदार्थांची उलाढाल होत असूनही पोलीस प्रशासन सुस्त का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तातडीच्या कारवाईची मागणी
उरणची तरुण पिढी शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडत आहे. जर वेळीच या बेकायदेशीर टपऱ्यांवर धाडी टाकल्या नाहीत आणि नशा विक्रीचे जाळे तोडले नाही, तर उरण तालुका नशेच्या अंधकारात बुडण्यास वेळ लागणार नाही. आता पोलीस अधीक्षक आणि संबंधित प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
